व्हिडीओ; पंकजा मुंडेंच्या रक्षाबंधनानिमित्त खास शुभेच्छा


मुंबई – आज रक्षाबंधनानिमित्त सर्व बहीण-भावांना खास शब्दांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, पंकजा मुंडेंकडून ज्यांना राखी बांधून घ्यायची होती, परंतु ते शक्य झाले नाही. अशांसाठी व सर्व माता-भगिनींसाठी देखील पंकजा मुंडे यांनी विशेष संदेश दिला आहे. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त करत, शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकजा मुंडें आपल्या संदेशात म्हणतात, नमस्कार, राखी पोर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या छोट्याशा बहिणीला, मोठ्या आईसारख्या बहिणीला, आपल्या भावाला, ज्यावर आपण मुलासारखे प्रेम करतो किंवा एखादा मोठा भाऊ ज्याला आपण वडिलाप्रमाणे आदर देतो. त्या सगळ्यांना आज आपल्याला खूप शुभेच्छा द्याव्या वाटतात. खूप प्रेम दाखवावे वाटते, असा आजचा दिवस आहे.

त्याचबरोबर प्रत्येक नात्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये एक सण आहे. याचे मला खूप कौतुक वाटते. मी आज बहीण-भावाचा सण सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. अनेकांची अशी अपेक्षा होती की त्यांनी येऊन मला भेटावे आजच्या दिवशी आणि मी त्यांना राखी बांधावी. एवढ्या लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली की मला आज असे वाटत आहे की मी किती भाग्यवान आहे. एवढ्या भावांची माझ्याकडून राखी बांधून घेण्याची इच्छा आहे. तर ते लोक माझ्यापर्यंत पोहचू शकले नाहीत किंवा मी त्यांना राखी बांधण्यासाठी वेळ दिला नाही, याचे कारण असे आहे की ज्या बहिणीने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवून वाढवले आहे किंवा ज्या बहिणीला तुम्ही साखरेचे पोते म्हणून पाठीवर घेऊन मिरवलेले आहे. त्या बहिणीचा तुमच्यावर पहिला हक्क असल्याचे पंकजा मुंडे म्हणतात.

तसेच मी बहीण आहेच, ताई आहेच पण ती बहीण तुमची आज फार आतुरतेने वाट पाहत आहे. तिच्याकडून तुम्ही राखी बांधून घेतली, तिला आठवणीने एखादी छान भेट दिली. तर ती माझ्यापर्यंत पोहचेल. तिचे जे ओतप्रोत तुमच्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाची बरोबरी मला करता येणार नाही. ज्या लोकांना मी अगोदरपासून राखी बांधत आली आहे, त्यांनाच राखी बांधते आहे, त्यात वाढ केलेली नाही. कारण, जर सगळेच राखी बांधायला आले, तर तो एक राजकीयच कार्यक्रम होतो व ते सगळे मला चुकीचे वाटते. तुमच्या मनातून निघालेला धागा माझ्या मनापर्यंत पोहचलेला आहे. आपल्यामध्ये न दिसणारे असे एक नाते तयार झालेले आहे. जे खूप शक्ती देणारे आहे. त्यामुळे तुम्ही मला प्रत्यक्षात भेटून राखी बांधून घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या बहिणीवर खूप प्रेम करा. बहिणीचा आदर करा आणि आपल्या बहिणीसारखाच इतर बहिणींचा आदर करा. एवढे जर केले तर नक्कीच मला आनंद वाटेल, असेही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवले आहे.

स्त्रीचा जन्म झालाच यासाठी आहे, की या विश्वामधील जेवढ्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या शुद्ध करण्यासाठी स्त्रीचा जन्म झालेला आहे. त्यामुळे नुसती एखादी गोष्ट सहन करणे म्हणजे स्त्री आहे, असे आपल्याला वाटायला लागते. पण सहन करणारी स्त्री असते, कारण स्त्रीची शक्ती अफाट असते, पण स्त्री सहन करण्याबरोबर शुद्धही करत असते. त्यामुळे सर्व माता-भगिनींना हीच विनंती आहे, की तुमच्या भावांकडून आजच्या दिवशी असे काही वचन घ्या, सगळ्या स्त्री जातीचा आदर त्यांनी करावा, स्त्रीकडे आदराने बघावे, स्त्रीला सुरक्षा, सन्मान द्यावा अशाप्रकारचा शब्द नक्कीच त्यांच्याकडू ओवाळणीत घ्या, असे पंकजा मुंडे शेवटी म्हणाल्या आहेत.