धोनी अशा ‘किलर’ लूक करून खेळणार आयपीएलचे सामने ?


आपल्या मेकओव्हरसाठी भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी कायमच चर्चेत असतो. त्याचा नवा लूक काही ठराविक काळासाठी ट्रेंडमध्ये असतो. म्हणूनच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याची ‘क्रेझ’ काही कमी झालेली नाही. गुरुवारी धोनीचा एक नवीन फोटो इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो कुलर लूकमध्ये भन्नाट दिसत आहे. हा फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाला.

महेंद्रसिंह धोनीचा हा नवीन लूक आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीसाठी असल्याची चर्चा रंगली आहे. यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुरू होईल. तत्पूर्वी हा फोटो शेअर करत स्टार स्पोर्ट्सने लिहिले, एमएस धोनी आयपीएलपूर्वी नवीन आहे. खऱ्या पिक्चरसाठी आमच्याबरोबर राहा.


धोनीचा एक कूल लूक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्याचा हा लूक हेअरस्टायलिस्ट आलिम हकीमने केला होता. आता आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात धोनी खेळताना दिसणार आहे. १९ सप्टेंबर रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे भारतीय खेळाडू यूएईत दाखल झाले असून सीएसके टीम दुबईत प्रशिक्षण घेईल. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर खेळाडूंना सराव करण्याची उत्तम संधी असेल. सुरेश रैना, कर्ण शर्मा, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर आणि अंबाती रायुडू हे खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत.