शिवसेनाप्रमुख स्मृतीस्थळ शुद्धीकरण; फडणवीसांची शिवसेनेवर परखड शब्दांत टीका


मुंबई – गुरुवारी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट दिल्यानंतर या स्मृतीस्थळाचे काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केल्याचे समोर आले. यावरून आता भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खुद्द राणेंनी देखील या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केलेली असताना आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. असे करताना शिवसेना कार्यकर्त्यांच्या या विचारांची तुलना देवेंद्र फडणवीस यांनी थेट तालिबानी विचारसरणीशी केली आहे. त्यामुळे यावरून आता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शुद्धीकरणाच्या प्रकारावर बोलताना शिवसेनेवर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला. हा प्रकार ज्या लोकांनी केला असेल, त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे, एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणे हे योग्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेऊन त्यांच्या समाधीवर कुणी जात असेल, तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता. ही कृती अतिशय अयोग्य असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले होते. पण या ठिकाणाहून नारायण राणे निघून गेल्यानंतर तिथे शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दुधाने शुद्धीकरण करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर तिथे फुले वाहण्यात आली.

यावेळी आप्पा पाटील यांनी देखील नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. आज ही वास्तू अपवित्र झाली. तिथे दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केल्यानंतर बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले तिथे वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसली. एवढ्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब कधी दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलतात. आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केले आहे. मी रोज येथे येतो, अशी प्रतिक्रिया हे शुद्धीकरण करणारे शिवसेना कार्यकर्ते आप्पा पाटील यांनी दिली आहे.