संभाजीराजेंच्या टीकेला कोणतेच उत्तर देणार नाही : अशोक चव्हाण


नांदेड – नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. राज्यातील अनेक जिल्ह्यात आंदोलने झाली, त्यावेळी त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी हजेरी लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण मला भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, असा घणाघात संभाजीराजेंनी केला. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते येथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असे म्हणत संभाजीराजेंनी कडाडून टीका केली होती. अशोक चव्हाण ज्यावर बोलताना म्हणाले, संभाजीराजेंबद्दल मला आदर आहे. आमचे आणि त्यांच्या घराण्याचे संबध हे पूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या टीकेवर कोणतेच उत्तर देणार नाही.