पारनेरच्या महिला तहसीलदारांचे आमदार निलेश लंकेंवर गंभीर आरोप


अहमदनगर – पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले असून यासंदर्भातील एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. महिला तहसीलदारांनी या क्लीपमध्ये आपले जीवन संपवणार असल्याचे म्हटल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान निलेश लंके यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ज्योती देवरे यांच्यावर आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

याआधीदेखील ज्योती देवरे यांच्यावर आरोप झाले आहेत. त्यावेळी तहसीलदारांना सूचना केल्या होत्या, तेव्हा मला त्यांनी अपरात्री आत्महत्या करण्याचे मेसेज पाठवल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. त्यासोबतच देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांनी बचावासाठी हा केविलवाणा प्रयत्न केल्याचे लंके यांनी म्हटले आहे. दरम्यान, ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.