लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण


पुणे – देशातील कोरोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून ओसरत असल्यामुळे अनेक निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. पण असे असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच आता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती अमोल कोल्हे यांनी ट्वीट करून दिली आहे.


कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारीत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे ट्वीट कोल्हे यांनी केले आहे.