किरीट सोमय्यांचा आरोप; शिवसैनिकांनी केली गाडीवर दगडफेक


वाशिम – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर आपल्या गाडीचे दोन फोटो सोमय्या यांनी पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप करत त्यांना गुंड असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

सोमय्या यांनी दुपारी पाऊणच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. हा सर्व घटनाक्रम साडेबाराच्या सुमारास वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.


आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचे कालच सोमय्या यांनी ट्विटरवरुन जाहीर केले होते. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचे सोमय्या यांचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी ट्विटमध्ये खासदार भावना गवळी आणि १०० कोटींचा घोटाळा या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे.

सोमय्या यांनी सकाळी वाशिमला पोहचल्यानंतरही ट्विटरवरुन फोटो पोस्ट केले होते. खासदार भावना गवळी ग्रुपचे १०० कोटींचे घोटाळे, हायवे कंत्राट अडथळे, खासगी कंपन्या, बँका, पोलीस स्थानकाला भेट देणार असल्याचे सोमय्या या ट्विटमध्ये म्हणाले होते. दरम्यान शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असला तरी या संदर्भात अद्याप शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.