मोदींच्या लोकप्रियतेला कोरोनाचे ग्रहण; तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली लोकप्रियता


नवी दिल्ली – मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिला असल्याची माहिती इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून समोर आली आहे.

मोदींची लोकप्रियता कमी होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा पंतप्रधान मोदींची नेता म्हणून लोकप्रियता जानेवारी २०२१ मध्ये ७३ टक्के एवढी होती. पण केंद्र सरकारचा दुसऱ्या लाटेमधील कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्यांना झालेल्या अडचणी यामुळे मोदींची लोकप्रियता ४९ टक्क्यांनी कमी झाल्याचे इंडिया टुडेच्या या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट निवडणूक प्रचार सभांमुळेच आल्याचे मत २७ टक्के भारतीयांनी व्यक्त केले आहे. तर कोरोना संदर्भातील नियमांचे पालन न केल्यामुळे दुसरी लाट आल्याचे मत २६ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तर कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे मत २०२० साली ऑगस्ट महिन्यात २३ टक्के लोकांनी व्यक्त केले होते. आता एका वर्षानंतर मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर नाराज असणाऱ्यांची संख्या वाढून ४९ टक्क्यांवर पोहचली आहे.

२३ टक्के लोकांनी देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न हा कोरोना परिस्थिती असल्याचे मत व्यक्त केले आहे. महागाई आणि वाढत्या किंमती हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे मत २९ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे, तर बेरोजगारांची वाढती संख्या हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे २३ टक्के लोकांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे एकीकडे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाली असताना दुसरीकडे गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस हा विचार योग्य नसल्याचे म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४४ टक्के लोकांनी सध्या निर्माण झालेले आरोग्यासंदर्भातील संकट हे केंद्र आणि राज्य दोन्हींची समान जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.