नितीन गडकरींच्या ‘त्या’ पत्राला उद्धव ठाकरेंचे उत्तर


मुंबई – काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राज्यात रस्तेबांधणीची कामे करत असताना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली होती. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नितीन गडकरी यांनी एक खरमरीत पत्रच लिहिले होते. त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात असाच प्रकार सुरू राहिला, तर राज्यातील रस्त्यांची कामे मंजूर करताना विचार करावा लागेल, असा इशारा देखील दिला होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या पत्राच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना गडकरींना ग्वाही देखील दिली आहे.

मुख्यमंत्री या पत्राविषयी बोलताना म्हणाले, नितीनजी तुम्ही फार प्रेमात बोलता, पण पत्र कठोर लिहिता. तुमचे आणि आमचे नाते थोडे वेगळे आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. आपल्याला कल्पना आहे की शिवसेनाप्रमुखांची जी शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या कामात अडथळा येऊ द्यायचा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तुमच्या पत्राचा मी हलका-फुलका उल्लेख जरी केला असला, तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, की कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.