मुंबईतील लसीकरण आज आणि उद्या बंद


मुंबई – देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरण मोहिमेकडे पाहिले जात आहे. देशभरात लसीकरण मोहिमेने वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आज (गुरुवार) दिनांक 19 ऑगस्ट, 2021 आणि उद्या (शुक्रवार) दिनांक, 20 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईत 19 व 20 ऑगस्ट, 2021 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त झाल्यावर 21 ऑगस्टपासून लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंबईकरांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.