अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आश्रयाला


दुबई – तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये असल्याची माहिती मिळत असून या वृत्ताला संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) विदेश मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या ठिकाणी आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वीकारले असून त्यांना आश्रय दिला आहे. दरम्यान अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावे लागले, हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितले आहे.

रविवारी अशरफ गनी यांनी म्हटले होते की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात 20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते. रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की, देश सोडणे हा एकमेव पर्याय असेल.

तालिबानी जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले. तालिबान आता एक ऐतिहासिक परीक्षेचा सामना करत आहे. तालिबानने तलवार आणि बंदूकीच्या निर्णयात विजय मिळवला. आता आमच्या देशबांधवांचा सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता तेच अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवतील.