सिंधूच्या प्रशिक्षकांना मोदींनी दिला अयोध्येला जाण्याचा सल्ला

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी सोमवारी दिल्या गेलेल्या ब्रेकफास्ट पार्टी मध्ये बॅडमिंटन कांस्य पदक विजेती पीव्ही सिंधू आणि तिचे कोरियन प्रशिक्षक पार्क ताय सांग यांच्याबरोबर संवाद साधताना मोदींनी सांग यांना अयोध्याभेटीचा सल्ला दिला असे समजते.

भगवान रामाची जन्मभूमी अयोध्या भेटीचे निमंत्रण देताना मोदी यांनी सांग यांना अयोध्या आणि कोरिया यांच्यातले खास नाते विषद केले. यावेळी बोलताना मोदींनी द. कोरियाच्या प्रथम महिला, राष्ट्रपतींच्या पत्नी अयोध्येतील कार्यक्रमात सामील होण्यासाठी आल्या होत्या त्याची माहिती दिली. दीपावली साठी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी प्रथममहिला किम जुंक सुंग यांना अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा चार दिवस भारत दौऱ्यावर त्या आल्या होत्या आणि अयोध्येला गेल्या होत्या. त्यांच्या हस्ते क्वीन हूह मेमोरियलचा शिलान्यास झाला होता.

अयोध्या आणि कोरियाचे नाते सांगताना मोदी म्हणाले, पौराणिक अयोध्येची राजकुमारी सुरी राजा इसवी सन ४८ पूर्वी कोरियाच्या यात्रेवर गेली होती आणि तेथले राजे सुरो यांच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. त्यामुळे भारत आणि कोरिया यांचे नाते फार पूर्वीपासून आहे.