शिवसेनेच्या महिला नेत्या आशा बुचकेंचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश


मुंबई – काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मागील महिन्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी अखेर भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षप्रवेश केला.

आशा बुचके यांनी विधानसभा निवडणुकीत जुन्नर येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. याठिकाणचे तत्कालीन मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेने सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आशा बुचके शिवसेनेवर नाराज होत्या. नारायणगावच्या पदाधिकारी मेळाव्यात आशा बुचके यांनी सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव आणि विधानसभेत घेतलेली भूमिका यामुळे आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आगामी काळात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि भाजपला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेवर आणू. सत्तारूढ पक्षातून आशाताईंसारख्या कार्यकर्त्या भाजपमध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे. आशाताई बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपमध्ये सन्मान केला जाईल. भाजपमध्ये आतला-बाहेरचा, जुना-नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपला पक्षविस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेत आशाताई बुचके यांना न्याय मिळाला नाही. पण त्यांचा भाजपमध्ये सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. विधानसभेची निवडणूक ज्यावेळी होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते. पक्षाची कार्यकर्ता म्हणून आपण प्रत्येक घरात कमळ पोहचविण्यासाठी काम करू असे आश्वासन आशा बुचके यांनी दिले.