गेल्या ५ दिवसांपासून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अज्ञातवासात


मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर पाच दिवसांनी, ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सूत्रांनी CNN-News18 ला सांगितले. जेव्हापासून त्यांची होमगार्ड्सचे डीजी म्हणून बदली झाली, तेव्हापासून सिंग आता चार महिन्यांपासून रजेवर आहेत. ठाणे पोलिसांचे तपास पथक आता सिंग यांनी काही आठवड्यांपूर्वी सादर केलेल्या त्याच्या ठावठिकाण्याबाबत आणि वैद्यकीय अहवालांची पडताळणी करत आहे. सिंग यांचा फोन नंबर बंद आहे. आम्ही कायदेशीर पर्याय शोधत असल्याचे ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिसाने वृत्तवाहिनीला सांगितले.

काही राजकारणी आता सिंग यांना कथितपणे चंदीगडच्या बाहेर जाण्यास मदत केल्याबद्दल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांनी सादर केलेले काही वैद्यकीय अहवाल आहेत. हे खरे की खोटे आहेत याची शहनिशा करणार आहोत आणि पडताळून पाहत आहोत. ज्या डॉक्टरांनी ते जारी केले आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्कात असल्याचे एका तपास अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.