लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तालिबानच्या कृत्याचे मुनव्वर राणा यांनी समर्थन केले आहे. अफगाणिस्तानपेक्षा अधिक क्रूरता भारतात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘पहले रामराज था, अब कामराज है’, अशी टीकाकेली आहे.
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे वादग्रस्त वक्तव्य; भारतात अफगाणिस्तानपेक्षा जास्त क्रुरता
मुनव्वर राणा तालिबानचा बचाव करताना म्हणाले, लोक अफगाणिस्तानातून पळून जात आहेत, कोणीही कोठूनही पळून जाऊ शकतात. यूपीची अवस्था पाहून येथूनही पळून जावेसे वाटत असल्याचे सांगत त्यांनी उत्तर प्रदेशची तुलना तालिबानी राजवटीशी केली आहे. भारताचे अफगाणिस्तानने कधीही नुकसान केले नाही, अफगाणिस्तान भारताचा सर्वात चांगला मित्र आहे. तालिबानी नव्हे त्यांना अफगाणी म्हणायला हवे, असेही मुनव्वर राणा यांनी म्हटले आहे.
तालिबान वाईट लोक नाहीत, परिस्थितीमुळे ते असे झाले आहेत, 20 वर्षांपासून तिथे दडपशाही होत आहे, जी अन्यायाची बीजे 20 वर्षं रोवली गेली, त्यातून गोड फळे कशी मिळतील, असा सवाल त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणतात की, अफगाणिस्तान हा नेहमीच भारताचा मित्र राहिला आहे. तेथील लोकांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे, म्हणूनच त्यांना येथे यायला आवडते.
भारताने अफगाणिस्तानला नव्हे तर पाकिस्तानला घाबरण्याची गरज आहे, तालिबानचा काश्मीरशी काहीही संबंध नसल्याचे म्हणत मुनव्वर राणा यांनी तालिबानी दहशतवाद्यांची तुलना महर्षी वाल्मिकीशी केली आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याच्या घटनेचा संदर्भ देत तालिबानचेही तसेच होईल, असा दावा मुनव्वर राणा यांनी केला आहे.