कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची तुर्तास गरज नाही; WHOचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही. आरोग्य संघटनेने बुधवारी म्हटले की, आपल्याला सर्वात आधी जगातील गरीब देशांचे पूर्णपणे लसीकरण करण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतरच श्रीमंत देशांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत विचार केला पाहिजे.

आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले की, जगभरातील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की, सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. दरम्यान, 20 सप्टेंबरपासून देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकन सरकारने डेल्टा व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी श्रीमंत देशांमध्ये कोरोना लसीच्या बूस्टर डोस देण्याबाबत म्हटले की, सध्या जगभरात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. चिंतेचे कारण म्हणजे, लस योग्य संख्येत, योग्य ठिकाणी पोहोचत नाही. त्यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत गरीब देशांमधील सर्वांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. दरम्यान, गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, मे महिन्यात प्रत्येक 100 लोकांसाठी सरासरी 50 डोस उपलब्ध होते आणि त्यानंतर आतापर्यंत ही संख्या दुप्पट झाली आहे. तेच जर कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत बोलायचे झाले तर, येथे पुरवठ्याच्या कमतरतेमुळे प्रत्येक 100 लोकांपाठी लसीची मात्रा सरासरी 1.5 डोस एवढी आहे. दरम्यान, आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस घेतल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होईल, असेही अद्याप सिद्ध झालेले नाही.