राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेपासून आठवड्याभरासाठी दिलासा


मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020 मधील पोर्नोग्राफी प्रकरणात दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्राला उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. या प्रकरणामध्ये राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्रा अटकेत असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, या प्रकरणातील अन्य आरोपी शार्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले असून पोर्नोग्राफीच्या अन्य एका प्रकरणात आपल्याला याच कलामांतर्गत अटक करण्यात आली आहे.

तसेच या तपासदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचे कुंद्राच्यावतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आले. राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल प्राजक्ता शिंदे यांनी त्याला विरोध केला.

या प्रकरणात राज कुंद्राची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो समानतेच्या आधारावर संरक्षण मागू शकत नसल्याचा दावा करत राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाकडे वेळ मागून घेतला. त्याची दखल घेत या प्रकरणात राज कुंद्राला आठवड्याभरासाठी उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देत सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.