मुंबईच्या पीएफ कार्यालयातील धक्कादायक घोटाळा उघड; कर्मचाऱ्याने लाटले तब्बल 21 कोटी


मुंबई : कोरोनाच्या संकट काळात लोकांना मदत व्हावी या हेतूने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली होती. मुंबईतील कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने याचाच गैरफायदा घेत तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतर्गत लेखापरीक्षणात समोर आले आहे.

तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा मुंबईतील कांदिवली येथीस पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने केल्याचे अंतर्गत इंटरनल ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे, मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान सगळ्या देशाचे लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होते, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कांदिवली येथील पीएफ कार्यालयातील 37 वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा याने ही अफरातफर केली.

लॉकडाऊनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड या अधिकाऱ्याला दिले आणि नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. तसेच सिस्टीममधील काही त्रुटींचा त्याने उपयोग केला. पीएफमधून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दुसऱ्या पडताळणीनंतरच त्याला मंजुरी दिली जाते. पण एक ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी अशी तरतूद नाही. लेखा परीक्षणातील तरतुदीं बाबतही माहिती होती.

दरम्यान, अंतर्गत लेखापरीक्षणाची व्याप्ती ईपीएफओने वाढवली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बँकांना ही 817 बँक खाती गोठवण्यासाठी (Freeze) पत्र लिहिले आहे. तसेच आतापर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मागोवा घेऊन, ती वसूल करण्यात आली आहे.

अशा प्रकारे करण्यात आला घोटाळा

 • ही फसवणूक जुलै 2021 च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे उघडकीस आली.
 • 817 स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा केला आणि एकूण 21.5 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवले.
 • या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढून घेण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
 • ज्या अधिकाऱ्याने हा घोटाळा केला त्याच्याबरोबर याच कार्यालयातील आणखी पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे.
 • त्यानंतर या घोटाळ्याचा सूत्रधार हा एका स्थानिक रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर बेपत्ता झाला.
 • फसवणुकीने काढलेले पैसे ईपीएफओच्या एक निधीतील होते.
 • ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नोंदणीकृत संस्थांनी ठेवलेल्या ठेवीचे पैसे जमा केले जातात.
 • हा पैसा मुख्यतः सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो.
 • त्याला या कामात त्याच्या सहाय्यकाने सहकार्य केले. गरजू आणि मुख्यतः बेरोजगार स्थलांतरित कामगारांकडून 5 हजार रुपये देऊन बँक खाती आणि आधार तपशील मिळवून त्यांनी हा गैरव्यवहार केला.
 • 10-15 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मुंबईस्थित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ खाती उघडण्यात आली.
 • 2014 पूर्वी उघडलेल्या पीएफ खात्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) काढण्याची तरतूद होती आणि पैसे काढताना तो नंबर तयार करणे अनिवार्य असते, नंतर ही सुविधा नव्हती. याचा फायदा घेण्यात आला.
 • 2006 मध्ये बंद झालेल्या बी. विजय कुमार ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, लँडमार्क ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड, न्यू निर्मल इंडस्ट्रीज, साथी वेअर कॉर्पोरेशन आणि नॅशनल वायर या कंपन्यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.