आजपासून 25 रुपयांनी महागला घरगुती एलपीजी सिलेंडर


नवी दिल्ली : सामान्य माणसांच्या खिशाला दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे कात्री लागत आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू झाले आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 859.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या अगोदर 1 जुलैला सिलेंडरचे दरात 25.50 रुपयांनी वाढ झाली होती.

दिल्लीत जून महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. त्यानंतर 1 जुलैला सिलेंडरच्या दरात वाढ होत किंमत 834 रुपये झाली. दरम्यान 1 जानेवारीपासून आजपर्यंतच्या दर बघितले तर गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 886 रुपयांना विक्री करण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 859.50 रुपये असणार आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 897.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत.

घरगुती गॅससोबतच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही 68 रुपयांनी वाढले आहेत. यापुर्वी 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.