नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या 9 रिक्त पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून सरन्यायाधीश एन.व्ही.रामाना यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर 9 न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 3 महिला न्यायाधीशांचा समावेश आहे. तसेच, वरिष्ठ वकिलांची नियुक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
9 न्यायाधीशांच्या नियुक्तीची कॉलेजियमने केंद्राकडे केली शिफारस; ज्यामध्ये 3 महिला न्यायाधीशांचा समावेश
कॉलेजियमने पहिल्यांदाच तीन महिला न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. यात न्यायमूर्ती नागरत्न भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयातून न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांनी ही माहिती समोर आली आहे. मार्च 2019 पासून न्यायमूर्ती नरिमन कॉलेजियमचे सदस्य होते. असे म्हटले जाते की त्याच्या ठाम भूमिकेमुळे नावांवर एकमत झाले नाही. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय ओका आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अकिल कुरेशी हे दोन वरिष्ठ न्यायाधीश होते.
केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या यादीतील समाविष्ठ न्यायाधीश :-
- तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.व्ही.नागरत्ना
- गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी
- ज्येष्ठ वकील पी एस नरसिंह यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्याची शिफारस
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एएस ओका
- गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ
- सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे के माहेश्वरी
- केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सीटी रवींद्रकुमार
- मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम एम सुंदरेश