गावाच्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – दत्तात्रय भरणे


सोलापूर : रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

शासनाच्या कृषी विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन शासकीय मैदान नेहरूनगर सोलापूर येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सोनाली कडते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आत्माचे उपसंचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवात सहभागी होऊन भाज्यांचे महत्त्व जाणून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महोत्सवात विविध 40 प्रकारच्या रानभाज्यांच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. स्टॉलधारकांनी विविध रानभाज्यांचे महत्व सांगितले. यावेळी रानभाज्या महोत्सवात सहभाग घेतलेल्या स्टॉलधारकांचा सत्कार पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

वृक्ष लागवडीबरोबरच संवर्धन करण्याचे दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी माझी वसुंधरा या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंदरा ‘अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेमध्ये केगाव येथील 43 एकर जागेवर ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 20 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, मनपातील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. माझी वसुंधरा अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी व युवकांनी सहभागी व्हावे. माझी वसुंधरा अधिकाधिक संपन्न होण्यासाठी प्रयत्न करावेत. या योजनेत निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास नगरोत्थानमधून एक कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.