मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धमकी, क्राईम ब्रांचकडून तपास सुरु


मुंबई : मुंबई पोलिस सध्या अशा एक व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तिने मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे मिलिंद नार्वेकर यांनी तक्रार केली आहे. याचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला असून चौकशी सुरु आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. यात आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी हा मेसेज मिळताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱ्यांपैकी त्यांचे नाव आघाडीवर आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा मेसेज करण्यासाठी ज्या नंबरचा वापर झाला आहे, तो नंबर कुठल्यातरी अॅप्लिकेशनचा वापर करुन घेतलेला आहे, ज्याला व्हर्चुअल नंबर असे देखील म्हणतात. आम्ही मोबाईल कंपन्यांकडे या नंबरविषयी माहिती मागवली आहे. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

क्राईम ब्रांचच्या अँटी एक्टोर्शन सेलने गुरुवारी तीन लोकांना अटक केली आहे. या तिघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह यांना फोन करत ट्रान्सफर पोस्टिंगची मागणी केली होती. पुण्यात देखील शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचे समोर आले होते.