काल दिवसभरात देशात 40 हजारांच्या जवळपास, तर एकट्या केरळमध्ये 20 हजार कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोजचा आकडा 40 हजारांच्या जवळपासच येत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात देशात 38,667 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे 478 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर आतापर्यंत देशात तीन कोटी 21 लाख 56 हजार जण कोरोनाबाधित झाले आहेत. यापैकी 4 लाख 30 हजार 732 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 38 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 87 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

शुक्रवारी देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद केरळमध्ये झाली आहे. काल केरळमध्ये 20,452 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 114 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये आतापर्यंत 36 लाख 52 हजार 90 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 18,394 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 16,856 जण केरळमध्ये कोरोनामुक्त झाले.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल दिवसभरात 6,686 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे.

महाराष्ट्रात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81), नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21), बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.