पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नाही -सायरस पूनावाला


पुणे – महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये आढळून आले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचे चित्र मध्यंतरी निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. पण त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही.

तरी आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी यासंदर्भातील एक मोठा खुलासा केला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यामध्ये असल्याचे अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. पण त्यावर केंद्रातील मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नसल्याचे सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

राज्यामध्ये अनलॉकदरम्यान पुण्यामधील निर्बंध शिथिल न करण्यात आल्यामुळे मागील आठवड्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्येही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. पण पुण्यातील कोरोनाबाधितांचा विचार करुन आधी सूट देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यावरुनचा वाद शांत होत असतानाच आता सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारनेच पुण्याला प्राधान्य क्रमाने लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात काहीच उत्तर न दिल्याचे म्हटले आहे.

कोरोना लॉकडाउनचे निर्बंध राज्य सरकारने शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असे मत पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोव्हिशिल्ड ही कोरोनाची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.

नोकरशाहचा पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना खूप जाच व्हायचा, आता कमी झाला असून याचे श्रेय मोदी सरकारला असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे. सीरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. पण आता पतिस्थिती बदलली आहे. कोरोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोव्हिशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. आम्ही ही लस अतिशय माफक दरात देत असल्याचेही यावेळी पूनावाला यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या एवढ्या नाममात्र किमतीत दिल्या असल्याचेही पूनावाला यांनी म्हटले आहे.

देशाविदेशात आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. पण लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार विशेष आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात टिळकांचे मोठे योगदान आहे. आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी काही नाही. आजवरचा प्रवास खूप वेदनादायी होता. आता तो कौतुकास्पद ठरला असून दिवंगत प्रिय पत्नी विलू यांना पुरस्कार अर्पण करतो, अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी या पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.