ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आणि या जबाबदारीतून मी पळणार नाही – उद्धव ठाकरे


मुंबई : राज्यातील राजकारण नवी दिल्लीत भेटीगाठी आणि जोर बैठकामुळे तापलेले असतानाच दुसरीकडे, माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पाहत आहात. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आहे आणि या जबाबदारीतून मी पळणारा नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुंबईत आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा पार पडला.

हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसैनिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेले “मार्मिक” व्यंगचित्र साप्ताहिकाने आज ६१ वर्ष पुर्ण केली. शिवसेना पक्षाच्या प्रवासात “मार्मिक” व्यंगचित्र साप्ताहिक शिवसेनेच्या स्थापनेचा पाया होता.

आज “मार्मिक” चा होत असलेल्या 61 व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी यावेळी संवाद साधला. मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलत आहे. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पाहात आहात. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आणि या जबाबदारीतून मीपळणारा नाही, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संकटाच्या छाताडावर चालून जा. ते खरे शौर्य आहे. आता रडायचे नाही लढायचे. ही प्रेरणा आपल्याला मार्मिकने दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, त्याआधी या कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकरयांच्या मार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती, न्यूज १८ लोकमतला विश्वसनीय सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.