मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी


मुंबई – कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे मुंबईमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिअंटमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिअंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.

डेल्टा व्हेरिअंटमुळे मुंबईमधील या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली. कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे.

डेल्टा व्हेरिअंटमुळे ६३ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे आम्ही कॉनटॅक्ट ट्रेसिंग केले आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झाला आहे. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे. डेल्टा व्हेरिअंटमुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असल्याचेही गोमारे यांनी म्हटले आहे.

श्वसनासंदर्भात त्रास या महिलेला असल्यामुळे तिला घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तिची कोरोना चाचणी २१ जुलै रोजी पॉझिटीव्ह आली. २४ जुलै रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, जिथे तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

याबाबत एन वॉर्डचे आरोग्य अधिकारी डॉ. महिंद्रा खंडाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या महिलेला आधी विक्रोळीतील गोदरेज मेमेरियल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांनी ब्रिच कँण्डी रुग्णालयामध्ये दाखल केले. तिथेच या महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

डेल्टा प्लस हा कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिअंट आहे. राज्यामध्ये बुधवारी डेल्टा प्लसचे २० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी मुंबईमध्ये सात तर पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी सहा रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळून आले आहेत. येथे डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल रत्नागिरी (१२), मुंबई (११), ठाणे (६), पुणे (६) तसेच चंद्रपूर, अकोला, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीडमध्येही रुग्ण आढळून आले आहेत. गोंदिया, नांदेड, रायगडमध्ये प्रत्येकी दोन तर पालघरमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.