रामदास आठवलेंच्या कवितेवरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ


नवी दिल्ली – बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार घडला. विरोधकांनी यावेळी आपल्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, तर मार्शल्सकडून खासदारांवर, विशेषत: महिला खासदारांवर हल्ला झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले आणि अधिवेशन संपले. पण या गोंधळाच्या आधीपासूनच राज्यसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची आणि गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात आली असता, त्यांनी सादर केलेल्या कवितेमुळेही चांगलाच गदारोळ झाल्याचे पहायला मिळाले.

यमक जुळवून १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान आठवलेंनी एक कविता सादर केली. त्यावेळी पिठासीन डॉ. सस्मित पात्रा यांच्याकडे विरोधकांनी आक्षेप नोंदवत या कवितेमधील एक शब्द संसदीय नसल्याचा आरोप केला. त्यावर पात्रा यांनी मी तुमच्या मुद्याची दखल घेतल्याचे सांगत आठवलेंना त्यांचे बोलणे पूर्ण करण्यास सांगितले. पण आठवलेंनी कविता सादर करताना विरोधी खासदारांनी आराडाओरड सुरु ठेवला. तेव्हा पात्रा यांनी अससंदीय शब्द रेकॉर्डमध्ये घेतला जाणार नसल्याचे विरोधकांना सांगितल्यानंतरही आठवले बोलताना विरोधक गोंधळ करत होते.

आपल्या शैलीमध्ये यमक जुळवून आठवलेंनी खास पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. या नवीन घटनादुरुस्तीमुळे सर्व सामास वर्गातील जनतेला लाभ होणार असून पुन्हा २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होतील असे या कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी मांडले. पण या कवितेमध्ये त्यांनी पंगा या शब्दाला यमक जोडण्यासाठी वापरलेल्या शब्दावर विरोधी पक्षांना आक्षेप घेतला. तसेच हा शब्द रेकॉर्डमधून काढून टाकावा, ही संसदीय भाषा नाही असे म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे खासदार मात्र या कवितेवर मनसोक्त हसताना दिसले.

आठवलेंनी सादर केलेली कविता…

मेरा आज बहुतही आनंदी है मन क्यो की पास हो रहा है १२७ वा संशोधन

अब खुश हो जाऐंगे एससी, बीसी और ओबीसी जन वो आ गया है नजदीक क्षण

जो करती है काँग्रेस और विरोधी दलोपर वार वो है मोदी सरकार
मोदीजी के लिये २०२४ मे खुल जाऐगा सत्ता का द्वार मोदी हो जाऐंगी प्रधानमंत्री पद पर स्वार

काँग्रेस और विरोधी दलवाले रोज बोल रहे है हाय हाय
लेकिन नरेंद्र मोदी दे रहे है सबको सामाजिक न्याय
२०२४ मे जनता आपको करेगी बाय बाय
फिर हम काँग्रेस को करेंगे हाय हाय

अगर आप रोज करते रहोंगे हाऊस मे दंगा
तो एक दिन कर देंगे हम आपको नं*…
नरेंद्र मोदीजी से मत लो पंगा…

मात्र नंतर हा शब्द रेकॉर्डवरुन हटवण्यात आल्याची माहिती पिठासीन अध्यक्षांनी दिली.