तालिबानचा भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेल्या Mi-24 हेलिकॉप्टरवर कब्जा


काबूल – तालिबानकडून अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी हल्ले सुरू आहेत. यादरम्यान, अफगाणिस्तानला भारताने भेट दिलेल्या हेलिकॉप्टरवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड गायब आहेत. तालिबानने हे ब्लेड हेलिकॉप्टरचा वापर हल्ला करण्यासाठी वापरू नये, यासाठी पूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याने काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२०१९ मध्ये तीन चित्ता हेलिकॉप्टर्ससह Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर भारताने अफगाण हवाई दलाला भेट दिले होते. Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर २०१५ मध्ये अफगाणिस्तानला भेट देण्यात आलेल्या चार लढाऊ हेलिकॉप्टरच्या बदल्यात देण्यात आले होते.

हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी अफगाणिस्तानचे नेतृत्व संघर्ष करत असताना हे हेलिकॉप्टर तालिबानने ताब्यात घेतले आहे. सद्यस्थितीत अफगाणिस्तानच्या ६५ टक्के भूभागावर तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. गुरुवारी तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानातील प्रांतीय राजधानीतील पोलीस मुख्यालय ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

राजधानी काबुल पासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगानिस्‍तानमधून अमेरिकन आणि नाटो सैनिक हटल्यानंतर तिथे तालिबान्यांचे वर्चस्व वाढले असून परिस्थिती गंभीर होत चालली असल्यामुळे अफगानिस्तानमधून लोक पलायन करत आहेत.