अखेर या दिवशी रिलीज होणार बिग बींचा बहुप्रतिक्षित ‘चेहरे’


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चेहरे’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि इम्रान हश्मी मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. ९ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख सांगितली आहे. ‘ २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये चेहरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी व्हिडीओ शेअर करत दिले आहे.


यापूर्वी ९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट येणार होता. पण चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले होते. अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट चेहरे ९ एप्रिल २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख कळवण्यात येईल, असे त्यांनी आपल्या ट्वीमध्ये म्हटले होते.

रुमी जाफरी यांनी ‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.