मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा


मुंबई – सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. अशातच काही दिवसांपूर्वी यंदा लालबागचा राजा विराजमान होणार असल्याची माहिती मंडळाने दिली होती. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावमुळे ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता. पण यावर्षी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशातच आज लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा पार पडला.

यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपला 88 वा गणेशोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यंदा मंडळातर्फे शुक्रवार म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत साजरा होणार आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी ठिक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

आज पहाटे सहा वाजता जगभरातील गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. कोरोना निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा सोहळा जाहीरपणे न करता, काही मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना निर्बंधांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून यंदा गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध जे नियम शासनाने घालून दिले आहे, त्याचे सुद्धा काटेकोरपणे पालन मंडळाकडून केले जाईल. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांना हे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी सुद्धा मंडळाकडून तयारी केली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले की, लालबागच्या राजाची लाखो भाविक वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण काल झालेल्या मंडळाच्या बैठकीत यावर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. भाविकांना ऑनलाइन दर्शन, ऑनलाइन प्रसादाची सुविधा केली जाणार आहे. त्यामुळे येथे कुठेही गर्दी होणार नाही.