जाणून घ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल सर्वकाही


नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत आता दर महिन्याला केवळ एक रुपया भरावा लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला दोन लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

विमा ही आजच्या धकाधकीच्या आयुष्यात केवळ गुंतवणूक नव्हे, तर अत्यंत आवश्यक बाब बनली असल्यामुळे आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळू शकते. उच्च मध्यम वर्गातील बहुतांशी लोक आपला विमा उतरवतात, पण गरीब लोकांना याचे प्रिमियम भरायला परवडत नसल्यामुळे ते याकडे वळत नाहीत. त्यामुळे गरीब कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत वर्षाला 12 रुपये भरावे लागणार असून त्यामुळे दोन लाखांचा अपघात विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा 12 रुपयाचा प्रिमियम वर्षातून एकदाच भरावा लागणार असून ते आपल्या बँकेच्या अकाऊंटमधून आपोआप कट होणार आहेत.

या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्यास दर वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अकाऊंटमधून 12 रुपये कट होणार आहेत आणि आपल्याला 1 जून ते 31 मे या कालावधीच्या दरम्यान विम्याची सुरक्षा मिळणार आहे. या योजनेनुसार, व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल, तर जखमी झाल्यास किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी बंद पडते.

या योजनेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या बँकेत जावे लागेल आणि तसा अर्ज करावा लागेल. यासाठी आपण बँक मित्रांचीही मदत घेऊ शकता. केंद्र सरकार सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या सहकार्यांने ही योजना राबवत आहे.

18 ते 70 वयोगटातील लोकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ होणार आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षाच्यावर असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.