अखेर रिलीज झाले सोनू सूदचे नवे गाणे; सोशल मीडियावर घातला धुमाकूळ


बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निधि अग्रवालच्या रोमॅण्टिक केमेस्ट्रीने भरलेले ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणे अखेर रिलीज करण्यात आले आहे. अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचे रीक्रिएटेड व्हर्जन असलेले ‘साथ क्या निभाओगे’ गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या ९० च्या दशकातील जुन्या आठवणी या गाण्याने ताज्या केल्या आहेत. सोनू सूदच्या या गाण्यासाठी त्याचे फॅन्स बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. युट्यूबवर या गाण्याने लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

खूपच इंटरेस्टिंग आणि खास एलिमेंट सोनू सूदच्या या गाण्यात दिसून आले. या गाण्याची कोरिओग्राफी आणि डायरेक्शन दिग्दर्शिका फराह खान हिने केले आहे. पंजाबच्या हिरवाईत शूट केलेल्या या गाण्यात प्रेमींची कहाणी दाखवण्यात आली आहे. या गाण्यात सोनू सूदने एका शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे, जो पुढे जाऊन एक पोलिस अधिकारी बनतो.

एक देसी लव्हस्टोरी फराह खान दिग्दर्शित या गाण्यात दाखवण्यात आली आहे. गाण्याच्या सुरूवातीला सोनू सूद एका पोलिस अधिकाऱ्याच्या वेशभूषेत दिसतो. सोनू सूद एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेला असताना त्या ठिकाणी निधिची भेट होते. ही भेट त्यांची खूप वर्षानंतरची असते. खूप वर्षानंतर एकमेकांना पाहून त्या दोघांच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. त्यानंतर गाणे फ्लॅशबॅकमध्ये जाते. गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये सोनू सूद आणि निधि यांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. सोनू निधिला प्रपोज करण्यासाठी तिच्या घरी जातो, पण त्यानंतर असे काही घडते की ते दोघे वेगळे होतात. पण एवढ्या वर्षानंतर झालेल्या भेटीनंतर ते दोघे पुन्हा एकत्र येतात, असा हॅपी एन्डींग दाखवण्यात आला आहे. या गाण्यातील शुद्ध देसी रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला.

अभिनेता सोनू सूद या गाण्याविषयी बोलताना म्हणाला, हॅपी न्यू इअरमध्ये फराहसोबत काम करण्यापासून ते 1990 च्या दशकात रेडिओवर अल्ताफ राजाची मूळ गाणी ऐकण्यापर्यंत सर्व जुन्या आठवणी या गाण्याने ताज्या झाल्या आहेत. तसेच हे गाणे पंजाबमध्ये शूट केल्याने मला घरची आठवण येत होती. मला आशा आहे की आमची मेहनत फळाला येईल आणि प्रेक्षकांना हे गाणे आवडेल.

गायक अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचे ९० च्या दशकात हिट गाणे ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याचे हे रीक्रिएट व्हर्जन आहे. काळ बदलला असला तरी या गाण्याची क्रेझ मात्र अद्याप तशीच आहे. याचा पुरावा सध्या याचे रीक्रिएट व्हर्जनमधील गाणे देते. हे गाणे रिलीज होताच काही तास उलटले नाही तर या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. युट्यूबवर या गाण्याने आतापर्यंत ८ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर सुद्धा हे गाणे जोरदार व्हायरल होऊ लागले आहे. तसेच सोनू सूदचे फॅन्स लाखोंनी कमेंट्स करत त्याचे कौतुक करताना दिसून येत आहेत.