
मुंबई – हॉटेलच्या वेळा वाढवण्या संदर्भात माध्यमांना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. टास्क फोर्सशी हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होणार असल्याचे शेख म्हणाले आहेत. तसेच, याबाबत आगामी कॅबिनेट मिटींगमध्ये देखील चर्चा होऊन, निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत लवकरच निर्णय होणार – अस्लम शेख
अस्लम शेख या विषयी बोलताना म्हणाले की, हॉटेल उद्योगाची लोक चांगली असून कुठेही अडून बसलेले नाहीत. जे जे सरकारने सांगितले, ते त्यांनी मान्य केले. त्यांना आता आम्ही चार वाजेपर्यंत संधी दिली ते चार वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवत आहेत. ते कायदेशीर मागणी करत आहेत, त्यांची विनंती आहे त्यासंदर्भात टास्क फोर्स बरोबर बोलणे सुरू आहे. उद्या, परवा केव्हाही कॅबिनेट होईल, तेव्हा यावर चर्चा करू आणि त्यांचाही वेळ आपल्याला कसा वाढवता येईल? मागर्दर्शक सूचना कशा करता येतील, हे ठरवले जाईल.
तसेच, सर्व व्यवहार आपल्याला सुरू करायचे आहेत, मॉल्स, हॉटेल्स सुरू करायचे आहेत. दुकाने आपण सुरू केलेली आहेत. आता लोकलमध्ये प्रवास करण्याची देखील संधी आपण दिलेली आहे. हे सगळे करत असताना, शासनाला थोडी संधी द्यायला हवी, एकदमच आक्रमक व्हायची गरज नाही. चर्चा करून आठवडाभरात सर्व काही मार्गी लागणार आहे. आता रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांना पास मिळणार आहेत. हॉटेल चालकांना देखील योग्य वेळी संधी दिली जाईल, असे देखील मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसायिकांच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
