मुंबई – आज राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली असून दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्याचे वृत्त समोर आल्यामुळे, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, आज महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना समोर आल्याचे म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका
दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोरोना परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना आपल्या न्यायहक्कासाठी प्रवेश मिळणे दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात? असा सवाल दरेकरांना केला आहे.
मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा?
आघाडी सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे?
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे! pic.twitter.com/VPkKg1Y1z6— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) August 10, 2021
तसेच, दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे, हे दिसून येत आहे. नेमके कोणासाठी हे सरकार काम करत आहे. धनदांडग्यांसाठी करत आहे, दारू विक्रेत्यांसाठी करत आहे, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत आहे, हे एकदा जनतेला कळले पाहिजे, असेही प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवले आहे.
या प्रकारावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षा असलेल्या वास्तुत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून येतो, ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी शरमेची आहे. राज्य सरकारने याची तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, असे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
एबीपी माझाने सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱ्या राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचे विशेष वृत्त दिले आहे. दारूच्या बाटल्यांचा खच मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे दाखवले गेले आहे. हा प्रकार समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली असून, मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपासणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय, मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तसेच, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.