भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांनाही मिळणार कोविड लस

कोविड १९ लसीकरणाबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना सुद्धा कोविड १९ लस घेण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची आहे. ओळखपत्र म्हणून पासपोर्ट चालणार आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाने या बाबत एक पत्रक प्रसिध्द केले आहे.

भारतात महानगरात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक वास्तव्य करून आहेत. शहरांची लोकसंख्या जास्त असल्याने तेथे कोविड प्रसार होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे शहरातील सर्वांचेच लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. त्यात भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची सुरक्षा सुद्धा लक्षात घेतली गेली आहे. या नागरिकांना संक्रमण होऊ नये याची जशी काळजी घेतली जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पासून अन्य कुणालाही संसर्ग होऊ नये यासाठी लसीकरण आवश्यक आहे असे या पत्रकात नमूद केले गेले आहे.

देशात १६ जानेवारी २०२१ पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोविड १९ लसीकरण मोहीम सुरु झाली असून सध्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. देशात आत्तापर्यंत ५० कोटींच्या वर लसीकरण झाले आहे असे आकडेवारी सांगते.