मुलगी जर प्रौढ आणि कमवती असेल तर ती पालन-पोषणासाठी वडिलांच्या पैशावर हक्क सांगू शकत नाही


यमुनानगर : मुलगी जर प्रौढ, सुशिक्षित, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा महत्वपूर्ण निकाल एडीजे न्यायालयाने (अॅडिशनल डिस्ट्रिक्ट जज) दिला आहे. सीजेएम न्यायालयाने (चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) त्या आधी दिलेला निर्णय एडीजे न्यायालयाने रद्दबदल ठरवला आहे.

एका वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला. सीजेएम न्यायालयाने 2018 मध्ये एका याचिकेवर निकाल देताना वडिलांनी मुलीला स्वतःच्या खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देत वडिलांनी एडीजे न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, या याचिकेत वडिलांनी मुलगी त्यांच्यासोबत राहत नसून ती वेगळी राहत असल्याचे नमूद केले होते.

हरियाणातील यमुनानगरमध्ये सीजेएम न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी एडीजे न्यायालयात याचिका दाखल केली होती. एडीजे नेहा नौहरिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सीजेएमने कलम 125 अंतर्गत मुलीला स्वखर्चासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. कलम 125 अंतर्गत एडिजे न्यायालयाने प्रौढ, सुशिक्षित, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल, तर तिला वडिलांकडून स्वखर्चासाठी पैशांची मागणी करण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिला आहे. अशातच यमुनानगरच्या न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनेक बाजूंनी महत्त्वपूर्ण आहे.

दरम्यान, गेल्या बऱ्याच काळापासून रेल्वेमधून निवृत्त झालेले रमेश चंद्र यांचे आपल्या पत्नीसोबत वाद सुरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी आणि त्यांची मुलगी त्यांच्यासोबत राहत नाहीत. यापूर्वीच त्यांच्या पत्नीला तिच्या खर्चासाठी दरमहा एक हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुलीलाही दरमहा खर्चासाठी 3 हजार रुपये देण्यात येत होते.

अशातच न्यायालयात रमेश चंद्र यांचे वकिल संदीप शर्मा यांनी सांगितले की, मुलगी प्रौढ आहे. तसेच ती शिक्षित असल्यामुळे तिला वडिलांकडून खर्चासाठी पैसे मागण्याची अजिबात गरज नाही. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले होते की, वडिल 70 वर्षांचे आहेत, ते आधीच आपल्या पत्नीला दरमहा खर्चासाठी पैसे पुरवत आहेत. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. जर मुलगी लहान असती आणि आपला उदर्निर्वाह करण्यासाठी असमर्थ असती, तर अशा परिस्थितीत वडिलांनी पैसे देणे योग्य ठरले असते, पण या प्रकरणात मुलगी प्रौढ असून स्वतःचा उदर्निर्वाह करण्यास समर्थ आहे.

दरम्यान रमेश चंद्र यांच्या मुलीचे वकिल विनोद राजोरिया यांचे म्हणणे आहे की, एका अविवाहित तरुणीने आपल्या वडिलांकडून खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही युवती प्रौढ असल्यामुळे ती आपल्या वडिलांकडे खर्चासाठी पैसे मागू शकते. परंतु, न्यायालयाने म्हटले आहे की, मुलगी प्रौढ आहे, तसेच स्वतःचा उदर्निर्वाह करण्यासाठी ती सक्षम असल्यामुळे ती वडिलांकडे पैशांची मागणी करु शकत नाही.