आज होऊ शकतो मंदिरे, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबतचा निर्णय


मुंबई : मुख्यमंत्र्यांनी काल नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. पण प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वाजता कोविड टास्क फोर्ससोबत बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सला देखील रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासंदर्भात आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

काल मुख्यमंत्री म्हणाले होते की, रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे असल्याचेही ते म्हणाले होते.

राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप वाढता असून ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.