मका, सोयाबीन देऊन खरेदी करता येणार टोयोटाची फॉर्च्यूनर  

जपानी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा मोटर्सने एक वेगळीच पेमेंट सिस्टीम सुरु केली आहे. यात ग्राहकाला टोयोटाची काही विशेष मॉडेल्स खरेदी करण्यासाठी पैसे मोजण्याचे गरज नाही. ग्राहक या कार्स, मका किंवा सोयाबीन देऊन खरेदी करू शकणार आहे. द. अमेरिकेतील ब्राझील देशात टोयोटाने अशी ऑफर देण्याचे ऐतिहासिक पाउल टाकले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि कृषी संदर्भात उद्योग करणारे ग्राहक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. कार्स विक्री वाढविणे हा त्यामागे कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी काही निवडक मॉडेल्सवर मका आणि सोयाबीन घेऊन कार खरेदीची संधी ग्राहकाला देत आहे आणि या योजनेला टोयोटा बार्टर असे नाव दिले गेले आहे. मोटर वनच्या रिपोर्टनुसार या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारच्या किमतीइतक्या किमतीचा मका किंवा सोयाबीन त्यासाठी कंपनीला द्यावे लागणार आहे. कंपनी साठी मका आणि सोयाबीनची किंमत एकच आहे.

ब्राझील येथे टोयोटाच्या कार्स विक्रीत थेट १६ टक्के हिस्सा ग्रामीण भागाचा आहे. कंपनीने आखलेल्या नवीन योजनेसाठी काही अटी आहेत. त्यानुसार ग्राहकाला कार देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडे शेतकरी प्रमाणपत्र आहे का, मका सोयाबीन लागवडीखाली पुरेसे जमीन क्षेत्र आहे का आणि मका सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे का याची खात्री करून मगच ग्राहकाला कार दिली जाणार आहे. या योजनेखाली हिलक्स पिक अप, कोरोला क्रॉस एसयूव्ही, एसडब्ल्यू ४ एसव्ही या कार्स आहेत. एसडब्ल्यू ४ एसव्ही हीच कार भारतात फॉर्च्यूनर नावाने विकली जाते.