बिहार सरकारने 80 हजार शिक्षकांना दिले गोणपाट विकण्याचे काम


पटना : बिहार सरकारने एक आदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना अशी मोकळी गोणपाट विकण्याचे काम दिले आहे. जवळपास 80,000 एवढी या शिक्षकांची संख्या आहे. या शिक्षकांनी त्यांना दिलेले गोणपाट विकली नाहीत, तर त्यांना पगार मिळणार नाही, असा आदेशही बिहार सरकारने जारी केला आहे.

ज्या गोणपाटातून सरकारी शाळांना मध्याह्न आहार योजनेसाठी तांदूळ वा अन्नधान्य पुरवण्यात येतात, ती मोकळी झाल्यावर शिक्षकांनी विकावी, असा आदेश बिहारच्या नितीश कुमार सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजे डीपीओंना दिला आहे. मध्याह्न आहार योजनेचे सचिव सतिश चंद्र झा यांनी एका पत्राद्वारे हा आदेश जारी केला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत या मोकळ्या गोणपाटची संख्या ही 1.27 कोटी असून प्रत्येकी दहा रुपये किंमतीने त्याचे 12.7 कोटी रुपये सरकारकडे जमा करावेत, असे या आदेशात नमूद केल्यामुळे प्रशासनाने सर्व सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिला आहे की मोकळी गोणपाट विकली नाही, तर त्यांना शिक्षा केली जाईल आणि पगारही दिला जाणार नाही. त्यामुळे बिहारमधील अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षक आता शिक्षणाच्या कामाव्यतिरिक्त ही गोणपाट विकण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.

अशाच प्रकारचा एक फतवा महाराष्ट्रातही मागे जारी करण्यात आला होता. शिक्षकांनी त्यांना खिचडी तांदूळासाठी पुरवण्यात आलेला रिकामे गोणपाट शासनाकडे जमा करावा, नाही तर त्याचे पैसे शिक्षकांच्या पगारातून कपात करण्यात येतील.