ईडीने जप्त केली अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती


पुणे – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या रडारवर पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित असून ईडीने यापूर्वी मनी लाँड्रिंगप्रकरणी दोघांना समन्स पाठवले होते. ईडीने आता अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा जप्त केली आहे. तब्बल ४ कोटी रुपयांची बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली आहे. अविनाश भोसले यांनी पुण्यातील सरकारी जागेवर बांधकाम केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही जमीन पुण्यातील गणेशखिंड रोडवरील रेंज हिल कॉर्नरमधील प्लॉट नंबर २, यशवंत घाडगे नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्थित आहे.

यापूर्वी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांची परकिय चलन गैरव्यवहार प्रकरणात ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली होती. पुणे, नागपूर, गोवा परिसरात भोसले कुटुंबीयांची तारांकित हॉटेल्स आहेत. तसेच दुबईतील एका कंपनीत भोसले यांची गुंतवणूकही आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’(फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट १९९९) कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती. भोसले यांची अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (अबिल) ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने भोसले तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात एक कोटी १५ लाख रुपये एवढी रक्कम ठेवण्यात आली आहे. परकीय चलन व्यवहार प्रकरणात भोसले यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (२१ जून) भोसले तसेच कुटुंबियांच्या नावावर असलेली ४० कोटी ४३ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

पुण्यातील कोरेगाव पार्क भागात भोसले यांची हॉटेल वेस्टीन, गोव्यात हॉटेल डब्ल्यू रिट्रिट अँड स्पा, नागपूरमध्ये हॉटेल ल मेरेडियन ही तारांकित हॉटेल्स आहेत. दुबईतील रोशडेल असोसिएट्स लिमिटेड या कंपनीत भोसले कुटुंबियांची गुंतवणूक आहे. परदेशातील बँकांमध्ये खाती आहेत. परकीय चलन व्यवहारात नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, ईडीने भोसले यांच्या गणेशखिंड रस्त्यावरील कार्यालयातही काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती.