ऑफर! ‘नीरज’ नावाच्या व्यक्तींना मिळणार मोफत पेट्रोल


नवी दिल्ली – नावात काय आहे, असे शेक्सपिअरने म्हटले होते. पण आता नावातच सर्व काही एका गोष्टीमुळे आले असल्याचे तु्म्हाला वाटू शकते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आता त्याच्या या प्रराक्रमामुळे त्याच्या नावाच्या लोकांना लाभ मिळणार आहे. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील नेत्रंग या छोट्या शहराच्या एका पेट्रोल पंपाच्या मालकाने एका वेगळ्या पद्धतीने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी या पेट्रोल पंप मालकाने त्याच्या पंपावर एक बोर्ड लावला. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल मिळेल, असे लिहिण्यात आले आहे. एसपी पेट्रोलियमच्या मालकाने सांगितले, की नीरज चोप्राच्या विजयाच्या सन्मानार्थ ही ऑफर ठेवण्यात आली आहे. नीरज नावाच्या प्रत्येक व्यक्तीला आपले ओळखपत्र दाखवून मोफत पेट्रोल मिळत आहे. एवढेच नव्हे, तर मालकाने त्याच्या पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नीरज नावाच्या व्यक्तींचे मनापासून स्वागत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


नीरज नावाच्या लोकांना भरूचमध्ये मोफत पेट्रोल मिळत असेल, तर जुनागढमध्येही ऑलिम्पियनच्या सन्मानार्थ अशीच ऑफर देण्यात आली आहे. या अंतर्गत नीरज नावाच्या लोकांना गिरनार रोप-वेवर मोफत फिरायची संधी मिळत आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भावनेला सलाम करण्याच्या उद्देशाने कंपनीने ही ऑफर दिली आहे. ही ऑफर २० ऑगस्टपर्यंत सुरू आहे.