ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज मराठ्यांचा वंशज; छत्रपती संभाजारीजेंच्या उपस्थितीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा निर्णय


पुणे – आज पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार छत्रपती संभाजारीजेंनी या बैठकीला संबोधित केले. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.

ही कामगिरी रोड मराठा नीरज चोप्राने केली आहे. प्रामुख्याने पानिपत लढाईसाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखले जाते. अशा हरयाणा स्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन, असे फलक बैठकीत लावण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्राचा सत्कार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नीरजच्या या पराक्रमानंतर त्यांच्यासंदर्भात इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात अशतानाच नीरज चोप्रा रोड मराठा असल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचसंदर्भात मागोवा घेतला असता ‘हिंदुस्थान टाइम्स’ला नीरजने दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये एक उल्लेख सापडतो.

नीरज हा रोड मराठा असल्याचा उल्लेख या मुलाखतीच्या सुरवातीलाच आहे. काही शतकांआधी नीरजचे पूर्वज हरयाणामध्ये स्थलांतरीत झाले. बाजीराव पेशव्यांनी पानिपतमध्ये लढलेल्या तिसऱ्या लढाईमध्ये ते लढले होते. नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत असल्याचे हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.