शिवसेना खासदार संजय जाधवांचे राष्ट्रवादीबाबत खळबळजनक विधान


मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन समोर आला आहे. पदनियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नियुक्ती करण्यात आली. शिवसेना खासदाराने ही नियुक्ती होऊ नये यासाठी थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेना खासदार संजय जाधव यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो, असे वक्तव्य संजय जाधव यांनी केले आहे.

जेव्हा माकडीण सुद्धा स्वतः बुडायची वेळ आली तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते तर लक्षात ठेवा राष्ट्रवादीला आम्ही कधीही घालू. शेवटी आता खूप सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे. काल फक्त कलेक्टर बदलायचा होता, तर मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीवाल्यांनी एवढे रान पेटवले, की जसे काही मोठा अपराध केला. आपले घ्यायचे झाकून दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी राष्ट्रवादीवाल्यांची अवस्था आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मान्य केला आहे. शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचे आहे, कुठपर्यंत सहन करायचे आहे, असे संजय जाधव यांनी म्हटले आहे. ते शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

आंचल गोयल या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर ३१ जुलैला पदभार स्वीकारतील हे अपेक्षित होते. त्या पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवस आधी येथे आल्या. पण अचानक आपण अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवावा, असा संदेश मुगळीकर यांना सामान्य प्रशासन विभागाकडून आला. गोयल यांना परत जावे लागले. या सर्व प्रकाराची माध्यमांनी दखल घेतली. सोशल माडियावरही लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

केवळ आपल्या तालावर कारभार करणारे मर्जीतील रबरी शिक्केच परभणीच्या पुढाऱ्यांना हवे आहेत, अशी सार्वत्रिक भावना तयार झाली होती. निदर्शने केली गेली. जागरूक नागरिक आघाडी या नावाने लोक एकवटल्यानंतर २४ तासांच्या आत आंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले. तसे स्पष्टीकरण पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिल्यामुळे या विषयाला पूर्णविराम मिळाला होता. तरी जिल्ह्यात यापूर्वी अधिकारी विरुद्ध पुढारी असे झडलेले अनेक संघर्ष यानिमित्ताने समोर आले आहेत.