शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला होणार अटक?; मुंबईत दाखल झाले लखनऊ पोलीस


मुंबई – पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत असून राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची काही बँक खाती देखील या कारवाईत सील करण्यात आली आहेत.

राज कुंद्रा अटकेत असतानाच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कारण आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात लखनऊमधील हसरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता लखनऊ पोलिसांची टीम या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे. लखनऊमधील जोस्तना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात पोलिसांच्या चौकशीत पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला आईसह अटक होण्याची शक्यता आहे.

आयोसिस वेलनेस सेंटर नावाची एक फिटनेस चेन शिल्पा चालवते. या कंपनीची ती चेअरमन असून तिची आई सुनंदा या कंपनीची डायरेक्टर आहे. शिल्पा आणि तिच्या आईने या फिटनेस चेनच्या ब्रॉन्चसाठी अनेकांकडून कोट्यावधी रुपये घेतले, पण नंतर पाठ फिरवली, असे आरोप शिल्पा आणि सुनंदा शेट्टीवर करण्यात आले आहेत. आता शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती लखनऊ इस्टचे डीसीपी संजीव सुमन यांनी दिली आहे.