Tokyo olympics : बजरंग पुनियाची कांस्यपदकाला गवसणी


टोकियो – भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा त्याने एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाल्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

बजरंगच्या वडिलांनी सामन्यापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली होती. आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने माझा मुलगा परतला नाही. संपूर्ण देशाच्या प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. महिन्याभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने उपांत्य फेरी गाठली. दुखापतीमुळे तो आक्रमक खेळू शकला नाही, असे बजरंगच्या वडिलांनी म्हटले होते.

उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून बजरंग ५-१२ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले.