येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचे एकच इंजिन असेल – देवेंद्र फडणवीस


पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल, असे स्पष्ट केल्यामुळे चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली का? असा सवाल उपस्थित होत आहे.

आज पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचे एकच इंजिन असेल एवढे ध्यानात ठेवा, असे फडणवीस म्हणाल्यामुळे मनसे-भाजप युती होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

आपण दिल्लीत जाणार असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीत भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले आहेत. तर पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप नेते सोमवारी दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या या दिल्लीवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचे यावेळी त्यांना सांगितले गेले. त्यांचे त्यांनी स्वागत केले. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनीही राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे. परंपरेने नेतृत्व येत असेल तर त्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या जबाबदाऱ्याही येतील, असे ते म्हणाले.

दरम्यान, आज दिल्लीत चंद्रकांत पाटील पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्याशी अपघाताने नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यामुळे काल आमची भेट झाली. त्यांनी चहासाठी बोलावले होते. आता दिल्लीत आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामे यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.