केंद्र सरकारची जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी


नवी दिल्ली – जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी केंद्र सरकारने दिल्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे भारताकडे आता कोरोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवरून केली आहे. भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात ५ लसीना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल, असे ट्विट मनसुख मांडवीय यांनी केले आहे.

दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून कंपनीने दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीचा दावा आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आता भारतात कोरोनावर ५ लसी देता येणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात ५० कोटी लसीचे डोस देऊन झाले आहेत. ५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारे ट्विट केले आहे. कोरोना विरोधातील भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.