Tokyo Olympics : Perfect 10 चा अनोखा विक्रम रचत १४ वर्षांच्या मुलीने जिंकले सुवर्ण पदक


टोकियो – चीन टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर असून ५ ऑगस्टपर्यंत चीनने तब्बल ३३ सुवर्णपदके या स्पर्धेत जिंकली आहेत. गुरुवारी झालेल्या महिलांच्या डायव्हिंग १० मीटर स्पर्धेमध्ये चीनच्या क्वान हँन्गचैन या मुलीने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. क्वान ही केवळ १४ वर्षांची असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चीनच्या ऑलिम्पिक पथकामधील क्वान ही सर्वात लहान सदस्य आहे. तिने या स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्येही पहिले स्थान मिळवल्यानंतर अंतिम फेरीमध्येही तिने आपल्या कामगिरीमधील सातत्य कायम राखत सुवर्णपदक पटकावले आहे.

क्वानने टोकियो एक्वटिक्स सेंटरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये एक नाही तर दोनवेळा परफेक्ट १० स्कोअर केला. एवढ्या कमी वयाच्या खेळाडूने सलग दोनदा परफेक्ट १० स्कोअर करणे हा देखील एक विक्रमच आहे. क्वानने एकूण ४६६.२० अंक मिळवले. रौप्यपदकही चीनच्याच महिला खेळाडूला मिळाले. चेन यूक्सीने ४३५.४० अंकांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या वू मलेसाने कांस्यपदक पटकावले.

या ऑलिम्पिकमध्ये चीनच्या क्वानसोबतच इतर देशांमधील कमी वयाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीची दखल संपूर्ण जगाला घ्यायला भाग पाडले आहे. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जपानच्याच मोमिज निशियाने महिला स्ट्रीट स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी निशियाने ही कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रमही निशियाने आपल्या नावावर केला आहे.

१३ वर्षे ३३० दिवस वय असताना निशियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे स्केटबोर्डिंगला पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्केटबोर्डिंग स्पर्धेमध्ये निशियाने सुवर्णपदक जिंकले, त्याच स्पर्धेतील रौप्यपदक ब्राझीलच्या रेयस्सा लीलने जिंकले. रेयस्सा ही १३ वर्षांचीच आहे. याशिवाय या स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या जपानच्याच फुना या मुलीचे वय १६ वर्षे आहे.

सीरियाची हेंड जाजा ही अवघ्या १२ वर्षांची असून ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. टेबल टेनिसच्या महिला सिंगल्समध्ये जाजा सहभागी झाली होती. मात्र ३९ वर्षीय ऑस्ट्रियन महिला खेळाडू ल्यू जियाविरुद्धचा सामना पराभूत झाल्यामुळे जाजा स्पर्धेबाहेर गेली. जाजाला पराभूत करणाऱ्या ल्यूची ही सहावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.