पु. ल. देशपांडे यांचे एफटीआयआयमधील दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला नाव


पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे नाव राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) दूरचित्रवाणी विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला देण्यात येणार आहे. त्या निमित्ताने लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (६ ऑगस्ट) कार्यक्रम होणार असून दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीच्या बाहेर पु. ल. देशपांडे यांच्या भित्तिचित्राचे अनावरणही करण्यात येणार असल्याची माहिती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिली.

पु. ल. देशपांडे यांचे नाव दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला देण्यासह दूरचित्रवाणी विभागातील दोन स्टुडिओंना पी. कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे नाव देण्यात येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एफटीआयआयचे माजी संचालक आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, लेफ्टनंट जनरल जे. एस. जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्यासह पु. ल. देशपांडे, पी. कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे कुटुंबियही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

याबाबत माहिती देताना एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला म्हणाले, की दूरचित्रवाणी विभागाची स्थापना १० ऑगस्ट १९७१ रोजी झाली होती. तेव्हापासून दूरदर्शनमधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, विविध अभ्यासक्रम यामुळे दूरचित्रवाणी विभागाला महत्त्व प्राप्त झाले. मराठीमध्ये साहित्य निर्मितीसह नाटक, चित्रपट, रेडिओ आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातही बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे पु. ल. देशपांडे यांचे नाव दूरचित्रवाणी विभागाच्या इमारतीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या पी. कुमार वासुदेव यांनी ‘हम लोग’ ही मालिका दिग्दर्शित केली होती. तर प्रा. वसंत मुळे एफटीआयआयमध्ये टेलिव्हिजन ट्रेनिंग सेंटरमध्ये शिक्षक होते. त्यामुळे दोन स्टुडिओंना त्यांची नावे देण्याचे ठरले.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे एफटीआयआयला भेट देणारे पहिलेच लष्करप्रमुख ठरणार आहेत. एफटीआयआय काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करासाठी २०१८ पासून विविध लघु अभ्यासक्रम राबवत असल्यामुळे दूरचित्रवाणी विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत लष्करप्रमुख एफटीआयआयला भेट देत असल्याचा आनंद आहे, असेही कँथोला यांनी नमूद केले.