बारावीच्या निकालातही कोकण विभागाने मारली बाजी; 46 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण


पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे. राज्यातील 46 विद्यार्थ्यांना 100 पैकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केला. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आऊटही काढता येणार आहे.

बोर्डाच्या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

विभागनिहाय टक्केवारी :

  • राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा : 99.81 टक्के
  • दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग : 99.79 टक्के
  • पुणे : 99.75 टक्के
  • कोल्हापूर : 99.67 टक्के
  • लातूर : 99.65 टक्के
  • नागपूर : 99.62 टक्के
  • नाशिक : 99.61 टक्के
  • अमरावती : 99.37 टक्के
  • औरंगाबाद : 99.34 टक्के

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

  • www.maharesult.nic.in
  • www.maharesult.nic.in
  • www.msbshse.co.in
  • www.hscresult.11thadmission.org.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.mahresult.nic.in